बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
बुलढाणा : सोशल मीडियावर रील आणि सेल्फी काढण्याच्या वेडामुळे आणखी एक तरुण आपला जीव गमावल्याची हृदयद्रावक घटना खामगाव तालुक्यात घडली आहे. रेल्वे ट्रॅकच्या बाजूला हेडफोन लावून रील शूट करताना मागून आलेल्या भरधाव ट्रेनने एका तरुणाला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
ही दुर्घटना 30 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अळसना फाटा परिसरात घडली. मृत तरुणाचे नाव शेख नदीम शेख रफिक (वय 20, रा. पिंपळगाव राजा) असे असून, शाकीर शेख (वय 27) हा गंभीर जखमी झाला आहे. दोघेही लग्नसमारंभासाठी निघाले असताना रेल्वे पुलाजवळ रील आणि सेल्फी घेण्याच्या नादात त्यांनी आपला जीव धोक्यात घातला.
प्राथमिक माहितीनुसार, दोघांनी रेल्वे ट्रॅकवर बसून रील चित्रीकरण सुरू केले होते. त्यांच्या कानात हेडफोन असल्याने मागून येणाऱ्या ट्रेनचा आवाज त्यांना ऐकू आला नाही. त्या वेळी भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेनने नदीमला जोरदार धडक दिली, ज्यामुळे तो काही अंतरावर फेकला गेला आणि जागीच मृत झाला. शाकीर शेख गंभीर जखमी अवस्थेत असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र, तो अत्यंत संवेदनशील असल्याने प्रसारित करता येत नाही. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, रील आणि सेल्फीच्या मोहात तरुणाई कशी जीव धोक्यात घालते, याचे हे एक धक्कादायक उदाहरण ठरले आहे.
घटनास्थळी रेल्वे सुरक्षा बलाने तत्परतेने पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे.
