नांदेड :-तालुका प्रर्तीनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई ही संस्था आजही बाबासाहेबांच्या विचारधारेचा, शिक्षणाच्या ध्यासाचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचा दीप तेवत ठेवत आहे. या संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे तब्बल ₹500 कोटी रुपयांचा ऐतिहासिक निधी मंजूर करण्यात आला आहे.
या ऐतिहासिक निर्णयानिमित्त नांदेड येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात विविध आंबेडकरवादी संघटना, समाजबांधव आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कार स्वीकारताना उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, हा निधी केवळ इमारती उभारण्यासाठी नसून ज्ञान, प्रगती आणि आधुनिकतेचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी आहे. या माध्यमातून अत्याधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण निर्माण होऊन हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या बाबासाहेबांच्या शिक्षणतत्त्वाला अधिष्ठान मानून संस्थेची वाटचाल सुरू आहे. सर्वांच्या सहकार्याने ही विकासयात्रा अधिक व्यापक, भव्य आणि उज्ज्वल होईल, असा दृढ विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
