दाताळा (प्रतिनिधी):
दाताळा जवळील माळेगाव येथे शनिवारी सकाळी झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे परिसरात हाहाकार माजला आहे. या मुसळधार पावसात शेतमालासह अनेक घरांचे मोठे नुकसान झाले असून नागरिक आणि शेतकरी हवालदिल झाले आहेत.
रात्रीपासून सुरू झालेल्या धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अन्नधान्य, कपडे, घरगुती वस्तूंची नासाडी झाली. काही ठिकाणी शेतमाल साठवलेला असल्याने धान्य, मक्याचे कणस, गंज्या आणि सोयाबीनच्या सुड्या पाण्यात भिजल्या. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी शेतात जाऊ शकले नाहीत, परिणामी नुकसानीचे प्रमाण अधिक वाढले.
शेतकरी सांगतात की, “रात्री झोपेत असतानाच पाणी घरात शिरले. शेतातील माल झाकण्यासाठी वेळच मिळाला नाही. त्यामुळे शेती आणि जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.”
शेतकऱ्यांची तारांबळ, चाऱ्याची टंचाई
या पावसामुळे शेतात उभे आणि तोडलेले पीक दोन्हीही पाण्याखाली गेले आहे. मक्याचे कणस, सोयाबीन, गंज्या भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, जनावरांसाठी कोरड्या चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.
महसुल विभागाकडून पंचनामे सुरू
घरांमध्ये शिरलेल्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तलाठी दीपक भगत आणि ग्राम महसूल अधिकारी आर. बी. घेवंदे यांनी तत्काळ सुरू केले. त्यांनी तहसीलदार, मोताळा यांच्या सूचनेनुसार प्राथमिक अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे.
दरम्यान, सरपंच निनाजी बढे, उपसरपंच नाना इंगळे, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कडू हिवाळे यांनी महसुल अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
स्थानिक ग्रामस्थांची उपस्थिती
पंचनाम्यावेळी अशोक भंगाळे, सुरेश भंगाळे, राजू पाटील, वासुदेव बोरले, पुरुषोत्तम खर्चे, नितीन भंगाळे, नीलेश भोंबे, जितेंद्र पाटील, सदाशिव भंगाळे, वैभव केणे, गोकुळ राजपूत, गोपाल पाटील, अतुल इंगळे, गोविंदा भोंबे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
या अनपेक्षित मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा आर्थिक संकट उभं राहिलं असून, प्रशासनाने त्वरित मदत जाहीर करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे
Users Today : 34