बुलढाणा (प्रतिनिधी):
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची तात्काळ दखल घेत केंद्रीय आयुष, आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी संबंधित यंत्रणेला त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्या आठवड्याभरात बुलढाणा जिल्ह्यात सतत पावसाची मालिका सुरू आहे. विशेषतः शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कपाशी, तूर, हरभरा, केळी यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचे शेतीवरील उत्पन्न धोक्यात आले आहे.
केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाशी थेट संपर्क साधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनाम्यांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आणि अहवाल शासनाकडे पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
त्याचबरोबर, शेतकऱ्यांनीही आपल्या गावातील कृषी अधिकारी व महसूल विभागाशी संपर्क साधून झालेल्या नुकसानीची अचूक माहिती सादर करावी, असे आवाहनही केंद्रीयमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयातून करण्यात आले आहे.
पावसाच्या या अनिश्चिततेमुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी उभ्या आणि तोडलेल्या पिकांचे नुकसान, तसेच धान्य व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार स्तरावर मदतीचा प्रस्ताव लवकरच तयार होईल, अशी माहिती जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे.
Users Today : 34