बुलढाणा (तालुका प्रतिनिधी):
बुलढाणा तालुक्यातील रायपूर परिसरात १ नोव्हेंबर रोजी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कापूस, मका आणि तुरीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतातील तसेच कापणी केलेला शेतमाल पाण्यात भिजून पूर्णपणे खराब झाल्याची माहिती मिळाली आहे.
अवकाळी पावसामुळे मक्याची कणसे पाण्यात भिजून कुजली, तर तुरीची फुले गळून पडल्याने उत्पादनात घट येणार आहे. आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे कापणी करून साठवलेला मका सुद्धा खराब झाला असून, काही ठिकाणी कणसांना कोंब फुटलेले दिसून आले आहेत.
रायपूर येथील शेतकरी ज्ञानेश्वर पुरुषोत्तम लकडे (भाग १, गट क्र. ७९०) यांच्या शेतातील कापणी करून ठेवलेली मक्याची कणसे पूर्णतः पाण्यात बुडाली आहेत. त्यामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
या अवकाळी पावसामुळे कपाशीच्या कैऱ्याही पाण्याने कुजण्यास सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
स्थानिक शेतकरी सांगत आहेत की, सततच्या पावसामुळे धान्य साठवणूक, जनावरांच्या चाऱ्याचा तुटवडा आणि आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने त्वरेने नुकसानाचे सर्वेक्षण करून मदतीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत, अशी मागणी होत आहे.
