बुलडाणा प्रतिनिधी ;-
बुलडाणा — “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामीण भारताचा विकास अत्यावश्यक आहे. या विकास प्रवासात त्रिस्तरीय पंचायत राजव्यवस्थेसोबत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
बुलडाणा शहरातील राधा गोबिंद मंगल कार्यालयात जिल्हा परिषद बुलडाणा तर्फे आयोजित “आदर्श ग्रामपंचायत अधिकारी गौरव सोहळा” मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आदर्श ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
ग्रामीण विकासाचा कणा — ग्रामपंचायत अधिकारी
या प्रसंगी बोलताना मंत्री जाधव म्हणाले —
“ग्रामपंचायत अधिकारी हे ग्रामीण विकासाच्या रचनेतील कणा आहेत. गावात पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे सर्व त्यांच्या समर्पणामुळे शक्य होतं. त्यामुळे ग्रामीण भारताला समृद्ध बनविण्यात ग्रामपंचायत अधिकारी ही अग्रगण्य शक्ती आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, ग्रामविकास हा फक्त शासनाचा कार्यक्रम नसून, तो एक जनआंदोलन आहे. प्रत्येक गावाने ‘आदर्श ग्राम’ बनविण्याच्या दिशेने वाटचाल केल्यास विकसित भारताचे स्वप्न लवकर साकार होईल.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन,
प्रकल्प संचालक (जळगाव) राजेश लोखंडे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार,
पी. एस. एंडोले, शिवशंकर भारसाकळे,
मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड,
समाज कल्याण अधिकारी अनिता राठोड,
तसेच मामसेवक संघटनेचे अध्यक्ष अशोक बुरकुल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
लाभार्थ्यांना ई-रिक्षाचे वितरण
कार्यक्रमादरम्यान समाज कल्याण विभागामार्फत मंजूर लाभार्थ्यांना ई-रिक्षाचे वितरण मंत्री जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागात स्वावलंबन आणि रोजगार निर्मितीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
‘विकासाची सुवर्णयना’ पुस्तिकेचे विमोचन
कार्यक्रमात जिल्हा परिषद निर्मित ‘विकासाची सुवर्णयना’ या माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. या पुस्तिकेत जिल्ह्यातील विविध योजनांची प्रगती, विकास कामांचा आढावा आणि यशस्वी प्रकल्पांची माहिती देण्यात आली आहे.
या सोहळ्यात उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामविकास विभागातील कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे मार्गदर्शन प्रेरणादायी ठरले असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी आदर्श कार्य करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा गौरव टाळ्यांच्या गजरात करण्यात आला.
Users Today : 38