मेहकर प्रतिनिधी :-
आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेहकर शहरात राजकीय समीकरणांपेक्षा मतदारांच्या जागरूकतेची चर्चा रंगू लागली आहे. आजची जनता जात-धर्माच्या पलीकडे जाऊन कार्यकुशल आणि प्रामाणिक चेहऱ्यांना प्राधान्य देऊ लागली आहे, अशी सर्वत्र भावना उमटत आहे.
गेल्या काही निवडणुकांच्या निकालांवरून हे स्पष्ट झाले की, जात आणि धर्माचा गवगवा करून मतदारांना भुलविण्याचे दिवस आता संपले आहेत. लोक आता अशा प्रयत्नांना “इंगा दाखवू” लागले आहेत, अशी मतप्रवाहातील चर्चा आहे.
लोकांची मानसिकता बदलतेय
“जात-धर्माला महत्त्व दिले असते, तर सिद्धार्थ खरात आमदार म्हणून निवडून आले नसते,” असे स्थानिक मतदारांचे स्पष्ट मत आहे. त्याचप्रमाणे “धर्माच्या मुद्यावर लढणारे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव एक लाख मतांनी जिंकले असते, पण तसे झाले नाही,” या उदाहरणांवरून मतदारांची दिशा किती बदलली आहे हे अधोरेखित होते.
एमआयएमच्या संस्थापक धर्मबांधवाच्या विचारांना सलाम करतानाही, सर्व मुस्लिम बांधव एकाच पक्षात नसून विविध राजकीय पक्षांत कार्यरत आहेत, हे वास्तव लोकशाहीच्या प्रगल्भतेचे द्योतक आहे.
“पक्ष नव्हे, माणूस ओळखून मत”
मेहकर-लोणार विधानसभा निवडणुकीतही “कट्टर वंचितवाल्यांनीही पक्ष न पाहता माणूस चालविला” हे उदाहरण आजही चर्चेत आहे. त्यामुळे आगामी नगर परिषदेची निवडणूकही “पक्ष, धर्म, जात नव्हे — तर व्यक्तिमत्त्व आणि कार्य” यावरच चालणार, असा सूर नागरिकांत उमटतो आहे.
प्रश्न उठवणारा जनमताचा बदल
मतदार आता विचारत आहेत —
“जात-धर्माच्या भरोशावर राजकारण करणाऱ्यांनी आतापर्यंत कोणत्या सामान्य बांधवाचे कल्याण केले?”
हीच विचारधारा निवडणुकीच्या केंद्रस्थानी येत आहे. धर्माचे झेंडे दाखवून सत्तेचे पेढे मात्र स्वतःच खाणाऱ्यांवर आता मतदार उघडपणे टीका करत आहेत.
‘चेहरा’ निर्णायक ठरणार
राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, मेहकर नगर परिषदेची निवडणूक ही पूर्णपणे ‘चेहऱ्यांवर आधारित’ होणार आहे. लोकांच्या दृष्टीने आता धर्माचा रंग नव्हे, तर कार्याचा उजाळा महत्त्वाचा आहे.
“कीतीही जात-धर्माचा रंग दाखविण्याचा प्रयत्न झाला, तर त्या उमेदवाराचा बेरंग जनता करणारच,”
अशी चर्चा बाजारपेठ ते चौकापर्यंत ऐकू येते.
माणुसकीचा अजेंडा महत्त्वाचा
यामुळे जात-धर्माचा झेंडा रोवणाऱ्यांपेक्षा माणुसकीचा अजेंडा घेऊन मैदानात उतरलेला उमेदवारच नगराध्यक्षपदी विराजमान होईल, अशी दाट शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
“आता जनता बोलतेय — धर्म नव्हे, विकास हवा; जात नव्हे, न्याय हवा!”
Users Today : 28