रेड-४ कांद्याची ११ एकरांवर यशस्वी लागवड; बेलगावच्या शेतकऱ्याचा आदर्श

KHOZ MASTER
2 Min Read

मेहकर प्रतिनिधी :

तालुक्यातील बेलगाव येथील प्रगतिशील शेतकरी भागवतराव आनुजी वानखेडे यांनी ११ एकरांवर रेड-४ या कांद्याच्या वाणाची लागवड करून परिसरातील शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. अनिश्चित हवामान, वाढता उत्पादन खर्च आणि अस्थिर बाजारभाव या तिहेरी आव्हानांमध्येही योग्य वाणाची निवड व नियोजनबद्ध शेती केल्यास भरघोस उत्पन्न मिळू शकते, याचे हे ठोस उदाहरण ठरत आहे.
या यशस्वी प्रयोगाची दखल घेत हवामान तज्ज्ञ Punjab Rao Hag यांनी वानखेडे यांच्या शेताला प्रत्यक्ष भेट देऊन कांदा पिकाची सखोल पाहणी केली. वाढीची स्थिती, कांद्याचा आकार, रंग, साठवण क्षमता आणि एकूण गुणवत्ता यांचा त्यांनी आढावा घेतला. हवामानातील सतत बदल लक्षात घेऊन पिकांची निवड व व्यवस्थापनात दूरदृष्टी ठेवण्याचा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
वानखेडे यांनी वैजापूर तालुक्यातील नांदगावचे शेतकरी व सरपंच Sharad Narayan Kolhe यांच्याकडून (National Horticulture Research and Development Foundation) रेड-४ वाणाचे कांदे (डोंगळे) उपलब्ध करून घेतले. या वाणाची वैशिष्ट्ये सांगताना कोल्हे यांनी स्पष्ट केले की, रेड-४ कांद्याची साठवण क्षमता तब्बल १० महिने असून हा चार पत्तीचा, सशक्त आणि दर्जेदार वाण आहे. बाजारपेठेत एक नंबर व दोन नंबर वर्गवारीत या कांद्याला चांगली व स्थिर मागणी व भाव मिळतो. एकरी सुमारे २५० क्विंटल उत्पादन क्षमता असल्याने साठवणूक करून विक्री करण्याचा पर्याय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतो.
शेतभेटीदरम्यान पंजाबराव हग यांनी उत्पादन खर्च कमी करण्यावर विशेष भर दिला. शास्त्रशुद्ध पाणी व्यवस्थापन, खतांचा संतुलित वापर आणि योग्य वेळेवर रोगनियंत्रण केल्यास उत्पादनात वाढ होऊन नफा निश्चित होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले. बाहेरील महागडी बियाणे खरेदी करण्याऐवजी निवडक व प्रमाणित घरगुती बियाण्याचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमास वसंतराव नाईक प्रगतशील शेतकरी पुरस्कारप्राप्त शेतकरी प्रीतेश विजयराव डहाके, प्रमोद राजू जाधव, मारुती प्रल्हाद बोरकर, डॉ. नामदेव आत्रुजी वानखेडे तसेच गावातील इतर प्रतिष्ठित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कांदा पिकातील साठवण तंत्रज्ञान, बाजारपेठेतील दरनियोजन आणि हवामानानुसार पिक व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
रेड-४ वाणाच्या यशस्वी लागवडीमुळे बेलगावसह महाराष्ट्रातील, विशेषतः वैजापूर व लासलगाव परिसरातील कांदा उत्पादकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. बदलत्या हवामानातही धाडसी निर्णय, शास्त्रशुद्ध पद्धती आणि नियोजनबद्ध शेतीमुळे शेतीत यश मिळवता येते, हा आत्मविश्वास या प्रयोगातून बळकट झाला आहे. आगामी हंगामात अधिकाधिक शेतकरी या वाणाकडे वळण्याची चिन्हे दिसत आहेत.

0 9 3 7 5 8
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *