बुलढाणा प्रतिनिधी ;-
बुलढाणा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंतिम आरक्षणाची अधिसूचना ३ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आली आहे. ही अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रसिद्ध केली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार आरक्षण प्रक्रिया पूर्ण
राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार व विभागीय आयुक्तांच्या देखरेखीखाली बुलढाणा जिल्हा परिषदेतील निवडणूक विभागनिहाय आरक्षण सोडत १३ ऑक्टोबर रोजी काढण्यात आली होती. त्यानंतर विभागनिहाय आरक्षणाचा प्रारूप नकाशा प्रसिद्ध करून १४ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या.
हरकतींवर विचार करून अंतिम अधिसूचना प्रसिद्ध
या कालावधीत प्राप्त झालेल्या सर्व हरकती आणि सुचनांचा बारकाईने अभ्यास करून जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी त्यावर निर्णय दिला. त्यानुसार बुलढाणा जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी अंतिम आरक्षण निश्चित करण्यात आले असून, त्याबाबतची अधिसूचना अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अधिसूचना सर्व कार्यालयांमध्ये उपलब्ध
सदर अधिसूचना जिल्हा परिषद कार्यालय, सर्व तहसील कार्यालये आणि पंचायत समिती कार्यालयांच्या सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक नागरिक, उमेदवार आणि राजकीय पक्षांना संबंधित कार्यालयांत जाऊन अंतिम आरक्षणाची माहिती घेता येणार आहे.
या अधिसूचनेनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून, संभाव्य उमेदवारांकडून आगामी निवडणूक लढतीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे.
Users Today : 38