मेहकर प्रतिनिधी ;-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे आज मेहकर येथे आयोजित ‘शिवसंकल्प पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरा’त जिल्हाभरातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या शिबिराचे उद्घाटन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले, तर कार्यक्रमाला माजी आमदार संजय रायमुलकर प्रमुख उपस्थित होते.
शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
खासदार श्रीकांत शिंदे यांचे आवाहन व्हिडिओ संदेशाद्वारे संवाद साधताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या विजयासाठी प्रत्येक शिवसैनिकाने जीवाचे रान करावे. शासनाने जनतेच्या प्रत्येक घटकासाठी कामे केली असून ती माहिती घराघरात पोहोचवणे हीच खरी निवडणूक तयारी आहे.”
राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे मार्गदर्शन ना. प्रतापराव जाधव म्हणाले,“महायुती सरकारने शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी अशा सर्व घटकांसाठी उपयुक्त योजना राबवल्या आहेत. या योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवून महायुतीचे उमेदवार निवडून आणणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे.”
महिलांच्या सहभागावर विशेष भर
“महिलांचा राजकारणातील सहभाग” या विषयावर आमदार मनीषा कार्यदे आणि शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
आ. कार्यदे म्हणाल्या,“एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच खरी शिवसेना आहे. ‘लाडकी बहीण योजना’, ‘लखपती दीदी योजना’, महिला प्रवाशांना एस.टी. भाड्यात सवलत, विद्यार्थिनींसाठी मोफत उच्च शिक्षण अशा योजना महिलांसाठी क्रांतिकारक ठरल्या आहेत.”डॉ. वाघमारे यांनी नमूद केले की,एकनाथ शिंदे यांनी शासनाच्या प्रत्येक दस्तऐवजात ‘आईचे नाव बापाच्या आधी’ नोंदवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, जो स्त्री सक्षमीकरणाचा खरा टप्पा आहे.”
Users Today : 26