शेलापुर–भाडगणी जोडरस्त्याचे डांबरीकरण करा; अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार – ग्रामस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :-
मोताळा तालुक्यातील शेलापुर ते भाडगणी या जोडरस्त्याचे डांबरीकरण तातडीने करण्यात यावे, अन्यथा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सन 1994 साली जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले होते. मात्र त्यानंतर गेल्या 30 वर्षांत या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. दरम्यान, ग्रामस्थ व शेतकरी वर्गाने वेळोवेळी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे मागणी करूनही ती कायम दुर्लक्षित राहिली आहे.

या रस्त्यावरून शेतमालाची वाहतूक करताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. खड्डेमय रस्त्यामुळे वाहनांची हानी होते, तर विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणेही कठीण झाले आहे. पावसाळ्यात तर रस्ता चिखलमय होऊन प्रवास अशक्य बनतो.

या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे आणि रस्त्याचे डांबरीकरण करण्याची तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकू, असा इशारा त्यांनी आज (४ नोव्हेंबर) दुपारी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून दिला आहे.

निवेदनावर ग्रामस्थांच्या मोठ्या संख्येने सह्या करण्यात आल्या असून, प्रशासनाने लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *