बुलढाणा प्रतिनिधी :-
मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे, पिंपळगाव देवी, पिंपरी गवळी आणि शेलापुर या चार महसूल मंडळांमध्ये १ नोव्हेंबर रोजी रात्री दोन वाजेपासून ते २ नोव्हेंबर सकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, मका, कपाशी आणि तूर पिकांचे अंदाजे ७०० ते ८०० हेक्टर क्षेत्रातील १०० टक्के नुकसान झाले आहे.
या भीषण परिस्थितीची पाहणी अस्तित्व संघटनेच्या अध्यक्षा सौ. प्रेमलता सोनोणे यांनी २ नोव्हेंबर रोजी आव्हा, टाकळी, माळेगाव, कोल्हे गवळी आदी गावांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन केली. त्यांच्या सोबत अनेक नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
ढगफुटीमुळे परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, मक्याच्या पिकाचे पाणी दोन फूटांपर्यंत साचले, कपाशीची झाडे जमीनदोस्त झाली, तर काही ठिकाणी शेतातील माती आणि पिके पूर्णपणे वाहून गेली आहेत. नाल्यालगतच्या शेतांमध्ये मातीचाही नायनाट झाल्याने अनेक ठिकाणी जमीन शेतीयोग्य राहिलेली नाही.
सौ. प्रेमलता सोनोणे यांनी या ठिकाणी भेट देऊन माननीय तहसीलदार साहेबांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला, आणि प्रत्यक्ष पाहणीसाठी विनंती केली. तत्काळ प्रतिसाद देत तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला.
सौ. सोनोणे यांनी तहसीलदारांकडे मागणी केली की,“प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा सरसकट पंचनामा करून कोणालाही वंचित ठेवू नये. मागील वेळी पिकविमा सर्वेक्षणात झालेल्या त्रुटी पुन्हा होऊ देऊ नका. शासनाकडून तत्काळ मदत जाहीर करून अहवाल त्वरीत पाठवावा,”
असे आवाहन त्यांनी केले.
यावर तहसीलदारांनी “शक्य तितक्या लवकर पंचनामे करून शासनाला अहवाल सादर केला जाईल”, असे आश्वासन दिले.
या पाहणी दौऱ्यात मिलिंद पाटील, गजानन कुकडे, उमेश घोंगटे, कृष्णा गवई, कृष्णा घोंगटे, संतोष घोंगटे, अतुल नारखेडे, तसेच माळेगाव, सावरगाव, दहीगाव, आव्हा आदी गावांतील अनेक शेतकरी उपस्थित होते.
या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळले असून, शेतकरी वर्ग शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहे.
