देऊळगाव राजा प्रतिनिधी :-
सिंदखेड राजा मार्गावरील जांभोऱ्यानजीकच्या पुलावर झालेल्या भीषण कार अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली.
मृत व्यक्तीचे नाव अर्जुनसिंग सुनीलसिंग ठाकूर (वय २५, रा. खामगाव) असे असून, ते आपल्या तिघा सहकाऱ्यांसह कार (क्रमांक MH-15 KK 0342) ने खामगावहून नाशिककडे जात होते. दरम्यान, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ही कार जांभोऱ्या पुलाच्या कठड्यावर जोरात आदळली. या भीषण धडकेत कारचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला.
अपघातात विजय ठाकूर, धीरज राठी आणि खंडागळे हे तिघे गंभीर जखमी झाले असून, सर्वजण खामगाव येथील रहिवासी आहेत.
घटनेच्या वेळी पोलिस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम सिंदखेड राजा येथे जात असताना हा अपघात त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ देऊळगाव राजा पोलिसांना कळवले, तसेच काही क्षणांतच पोलीस उपनिरीक्षक कांचन जारवाल, वाहतूक पोलिस विनोद चव्हाण व चालक संतोष मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
जखमींना तत्काळ देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर अर्जुनसिंग ठाकूर यांना मृत घोषित करण्यात आले, तर गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
या भीषण घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अपघातांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, अशी सूचना पोलिसांनी दिली आहे.
Users Today : 11