मेहकर प्रतिनिधी ;-
तालुक्यातील मोळा येथे आज श्री अवलिया महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित यात्रेला भक्तांच्या उत्साहाची पर्वणी लाभली. या यात्रेच्या निमित्ताने आज २१ क्विंटल पुरी-भाजीच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. मेहकर-लोणार मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात यांनी उपस्थित राहून भक्तांना महाप्रसादाचे वितरण केले आणि श्री अवलिया महाराजांच्या आशीर्वादाने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी मोळा येथील सरपंच पती विजय हरिभाऊ शेळके, संजय धोटे, डॉ. प्रकाश माळेकर, कैलास शेळके, संजय पाचरणे, दत्ताभाऊ पाटील झोटे, तसेच संस्थान व्यवस्थापक व यात्रा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. गावातील अनेक मान्यवर, भक्तमंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्यात सहभागी झाले.
मोळा यात्रा ही पंचक्रोशीतील नागरिकांच्या अपार श्रद्धेने साजरी केली जाणारी परंपरा असून, भक्ती, सेवा आणि सामाजिक एकोपा यांचे दर्शन या यात्रेदरम्यान घडते. दरवर्षी श्री अवलिया महाराज संस्थान, मोळा यांच्या वतीने हा भव्य यात्रा महोत्सव मोठ्या श्रद्धा-भक्तीने आयोजित केला जातो.
यंदा यात्रेचा कालावधी ५ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर असा असून, काल दिनांक ५ रोजी श्री अवलिया महाराजांची भव्य संदल मिरवणूक काढण्यात आली. आज महाप्रसाद वाटप पार पडले असून, उद्या दिनांक ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत रोषणाईचा कार्यक्रम होणार आहे.
मेहकर तालुक्यासह बुलढाणा जिल्हा आणि परिसरातील विविध भागांतून आलेले असंख्य भक्त या यात्रेत सहभागी होऊन भक्तीभाव, सेवा आणि एकतेचे सुंदर दर्शन घडवीत आहेत.
Users Today : 26