बुलढाणा प्रतिनिधी ;-
विविध कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील युवकांनी या महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले कलागुण सादर केले. लोकनृत्य, लोकगीत, कथालेखन, काव्यलेखन, पोस्टर, वक्तृत्व, विज्ञान मेळावा अशा विविध स्पर्धांमधून युवकांच्या बहुआयामी प्रतिभेचे दर्शन घडले.
या महोत्सवातील विजेते स्पर्धक आता अमरावती विभागीय युवा महोत्सवात बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
महोत्सवाचे उद्घाटन ६ नोव्हेंबर रोजी सकाळी झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक दत्तात्रय बिराजदार, सेवानिवृत्त कर्मचारी अजयसिंह राजपूत आणि जिल्हा युवा अधिकारी उपस्थित होते.
अमोल गायकवाड यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा संदर्भ देत युवकांमध्ये संयम, तळमळ, तेज, आदर, देशप्रेम आणि नशापासून दूर राहण्याचे गुण असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी मोबाईल आणि मादक पदार्थांपासून दूर राहून देश, समाज आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
अजयसिंह राजपूत यांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठाचा लाभ घेऊन युवकांनी आपल्या कलांना वाव द्यावा, असे आवाहन केले. तर दत्तात्रय बिराजदार यांनी प्रत्येक स्पर्धा ही जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे सांगत युवकांना उत्कृष्टतेसाठी सतत प्रयत्नशील राहण्याचा संदेश दिला.
प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले. त्यांनी युवा महोत्सवाचा उद्देश स्पष्ट करताना युवकांना त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन बुलढाणा जिल्ह्याचे नाव विभागीय, राज्य व राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करण्याचे आवाहन केले.
महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी परीक्षक म्हणून टिळक क्षिरसागर, गजानन लोहटे, वैभव वाघमारे, डॉ. सुभाष चिंचोले, डॉ. सिध्देश्वर नवलाखे, डॉ. मनिषा राऊत, डॉ. संगिता पवार, वैशाली तायडे, एकनाथ इंगळे, विक्रम धावंजेवार, अमर चिंतळे, धनंजय महितकर, सुभाष देशमुख आदींनी कार्य केले
Users Today : 22