धामणगाव धाड ;-
यंदा हिवाळ्याने थोडा उशीरच केला असला, तरी आता अंगाला झोंबणारी थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. कोजागिरी पौर्णिमेनंतरच थंडीचा प्रारंभ व्हायला हवा होता, परंतु अवकाळी पाऊस आणि वाढत्या उन्हामुळे हिवाळ्याची चाहूलच मिळाली नाही. मात्र आता दिवाळी संपून तब्बल १० ते १५ दिवसांनंतर थंडीने आपले आगमन जाहीर केले आहे.
पहाटे आणि सायंकाळच्या वेळेस गार वाऱ्याची झुळूक अंगाला भिडू लागली असून, “आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा” हे गाणे आता प्रत्येकाच्या ओठावर उमटताना दिसत आहे.
गावाकडे या ऋतूचा आनंद काही औरच — कमी वाहनांची वर्दळ, हिरवीगार वनराई आणि शांत वातावरण यामुळे थंडीची उब अधिक जाणवते. सकाळ-सायंकाळ गावकरी स्वेटर, टोपी, मफलर, रुमाल आणि घोगड्यांचा आधार घेताना दिसतात.
पुढील काही दिवसांत थंडीचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी उबदार कपडे बाहेर काढले असून, रस्त्याच्या कडेला पेटलेल्या शेकोट्या आता हिवाळ्याची खरी ओळख बनू लागल्या आहेत.
Users Today : 18