लोणार प्रतिनिधी :-
केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नीरज रायमुलकर यांच्या संकल्पनेतून शिवसेना (एकनाथ शिंदे) तर्फे वेणी व गुंधा येथे भव्य मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत झालेल्या या शिबिरांना महिलांसह पुरुषांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्टेट बँक फाऊंडेशनच्या सहकार्याने जीवनम सुरक्षा अभियान अंतर्गत ११ ते १९ नोव्हेंबरदरम्यान वेणी-वढव परिसरातील विविध गावांमध्ये आरोग्य शिबिरे राबवली जात आहेत. डॉ. हिवसे यांच्या नेतृत्वाखालील तज्ञ डॉक्टरांच्या टीमने कर्करोग, नेत्ररोग, श्वसनविकारासह एकूण १४ विविध आजारांची तपासणी केली. आजार निदान झालेल्या रुग्णांसाठी पुढील उपचार आणि आवश्यक शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहेत.
वेणी येथे निजामपूर, मातरखेड, मोहोतखेड आदी गावांतील शेकडो नागरिकांनी तपासणी करून घेतली. कार्यक्रमाला नीरज रायमुलकर, शिवसेना तालुकाप्रमुख भगवानराव सुलताने, सरपंच मनोज तांबिले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजीव तांबिले, समाधान साठे, अशोक हरदळकर, प्रल्हाद देवकर, माणिकराव जाव्हले, प्रवीण देशमुख, किरण मापारी, विशाल सातपुते यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गुरुवारी गुंधा येथे झालेल्या शिबिरातही नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली.
या मालिकेतील पुढील शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे —
१३ नोव्हेंबर : जाफराबाद
१४ : गुंजखेड
१५ : हिरडव
१६ : दाभा
१७ : वढव
१८ : पिंपळनेर
१९ नोव्हेंबर : शारा
परिसरातील सर्व नागरिकांनी या मोफत आरोग्य उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नीरज रायमुलकर यांनी केले आहे.
Users Today : 18