बुलडाणा प्रतिनिधी:-
बुलडाणा शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिजांचे अवैध उत्खनन सुरू असून दररोज शेकडो ब्रास मुरुमाची बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. या अवैध कृत्यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत असल्याची गंभीर परिस्थिती आहे. नियमित कारवाईअभावी गौण खनिज माफियांची निर्भयता वाढत असून त्यांना आळा बसण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
तहसीलदारांची रात्रीची गस्त — अवैध मुरुम वाहतूक करणारा टिप्पर जप्त
12 नोव्हेंबरच्या रात्री बुलडाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे हे दौऱ्यावर असताना त्यांनी अवैध मुरुम वाहतूक करणारा MH 28 AB 8303 क्रमांकाचा टिप्पर पकडला. वृंदावन नगर परिसरातून संशयास्पदरीत्या हा टिप्पर जात असल्याचे पाहून त्यांनी वाहन रोखून चौकशी केली. तपासात हे वाहन कौस्तुभ शेळके यांच्या मालकीचे असून ते मुरुमाची विना परवानगी तस्करी करत असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर महसूल विभागाने टिप्पर जप्त करून तो बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात जमा केला आहे. याप्रकरणी दंडात्मक कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती तहसीलदार कुमरे यांनी 13 नोव्हेंबर रोजी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश — तस्करांवर कारवाईला गती
बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना अवैध वाळू तसेच गौण खनिज तस्करांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
तहसीलदार कुमरे यांनी तस्करांना चकवा देण्यासाठी खाजगी कारने गस्त घालण्याची युक्ती अवलंबली होती. रात्री 10 वाजता चिखली रोड परिसरात त्यांना टिप्पर दिसल्याने ही कारवाई शक्य झाली.
महसूल पथकाचा सक्रिय सहभाग
या कारवाईत—
तलाठी गोपाल राजपूत,
अतुल झगरे,
चालक अशोक देवकर
यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.
या धडक कारवाईमुळे अवैध मुरुम तस्करांचे धाबे दणाणले असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून मिळत आहे.
Users Today : 22