बुलढाणा प्रतिनिधी :-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांना शस्त्रे जमा करण्याबाबत छाननी समितीने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यानुसार, सर्व संबंधितांनी तात्काळ आपल्या शस्त्रांची पोलीस स्टेशनमध्ये जमा करावी, असे निर्देश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.
छाननी समितीने जाहीर केलेल्या प्रमुख सूचना :
बँक, विविध संस्था, सोनार, देवस्थान आणि पेट्रोलपंप धारक यांच्याकडे असलेली शस्त्रे निवडणूक काळात जमा करण्याची आवश्यकता नाही.
नगरपालिका/नगरपरिषद हद्दीतील सर्व शस्त्र परवानाधारकांकडील शस्त्रे अनिवार्यपणे जमा केली जाणार.
निवडणूक काळात शस्त्र जमा करण्यापासून सूट मिळावी अशा विनंती अर्जांची पोलीस विभागाकडून सखोल तपासणी केली जाईल. त्यानंतर संबंधित अर्ज छाननी समितीकडे अंतिम निर्णयासाठी पाठवले जातील.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या परवानाधारकांवर कठोर कारवाई :
भारतीय दंड संहितेतील गंभीर गुन्ह्यांत अडकलेले, तसेच जामिनावर सुटका मिळालेल्या शस्त्र परवानाधारकांनी कायदा-सुव्यवस्थेचा भंग होऊ नये म्हणून त्यांची शस्त्रे तात्काळ जमा करणे बंधनकारक आहे.
निवडणुकांच्या काळात पूर्वी घडलेल्या दंगली, गोंधळ किंवा कायदा-सुव्यवस्थेचा भंग करण्यात थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या शस्त्र परवानाधारकांकडील शस्त्रे देखील पोलीस विभागाने तातडीने जमा करावीत.
जिल्हा प्रशासनाने याबाबत स्पष्ट केले आहे की निवडणूक प्रक्रियेच्या काळात शांतता आणि सुरक्षिततेचे वातावरण राखण्यासाठी सर्व शस्त्रधारकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
Users Today : 22