मेहकर प्रतिनिधी ;-
येथील श्री शिवाजी हायस्कूलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील नाली गेल्या काही दिवसांपासून पूर्णत: तुंबल्याने ती दुर्गंधी आणि घाणीचे केंद्र बनली आहे. यामुळे विद्यार्थी, शिक्षक तसेच स्थानिक नागरिक डास, माशा आणि असह्य दुर्गंधीचा त्रास सहन करत आहेत. परिसरात आरोग्यधोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही निष्काळजी व्यक्ती नालीत प्लास्टिकच्या पिशव्या, खरकटे अन्न, दुकानातील कचरा तसेच बांधकामातील विटांचे तुकडे टाकत आहेत. या कचऱ्यामुळे नाली पूर्णपणे तुंबून साचलेल्या पाण्यात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
नाली अगदी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराशी लागून असल्यामुळे विद्यार्थ्यांना रोज नाक दाबून शाळेत प्रवेश करावा लागतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शिक्षक व पालकांनी नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाने तातडीने नाली स्वच्छ करून परिसरात नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी केली आहे.
तसेच, योग्य ती कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे
Users Today : 18