बुलडाणा |
जीवन जगण्याची कला, आत्मचिंतन आणि अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग राष्ट्रसंत ललितप्रभु व मुनीश्री शांतीप्रिय म.सा. यांनी आपल्या दिव्य पावन वाणीतून लाखो लोकांसमोर उलगडला आहे. त्यांच्या दुर्मिळ आणि प्रेरणादायी प्रवचनांमुळे जीवन सुंदर, सरल व सार्थक बनते, मनाला शांती व संतुलन प्राप्त होते. या अमृतमय प्रवचनांचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक आणि सकल जैन संघाचे राजेश देशलहरा यांनी केले आहे.
सद्भावना सेवा समिती व सकल जैन संघ (बुलडाणा) यांच्या संयुक्त विद्यमाने जगप्रसिद्ध राष्ट्रसंत पं. पु. गुरुदेव ललितप्रभु आणि डॉ. मुनीश्री शांतीप्रिय म.सा. यांची प्रवचने आयोजित करण्यात आली आहेत. ही प्रवचने १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत सहकार विद्या मंदिर हॉल येथे, तसेच २० व २१ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत ए. आर. डी. लॉन्स (बुलडाणा) येथे होणार आहेत.
आरोग्य, आनंद आणि अध्यात्मिक ऊर्जेसाठी सकारात्मक जीवनशैली आवश्यक असून आदर्श जीवन कसे जगावे, याविषयी राष्ट्रसंत ललितप्रभु व मुनीश्री शांतीप्रिय म.सा. आपल्या अमृतमय वाणीतून मार्गदर्शन करणार आहेत. या प्रवचनांचा लाभ हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई तसेच सर्व धर्मप्रेमींनी घ्यावा आणि आपल्या जीवनाला आदर्श दिशा द्यावी, असे आवाहन राधेश्याम चांडक यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी पार पडलेल्या बैठकीस सद्भावना सेवा समिती व सकल जैन संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. अध्यात्म, सद्भावना व सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या प्रवचनांमुळे बुलडाणा शहरात भक्तिमय आणि सकारात्मक वातावरण निर्माण होणार आहे.
