बुलढाणा |
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी १६ डिसेंबर रोजी चिखली तालुक्यातील सवणा येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करत भारतीय संविधानाबाबत महत्त्वपूर्ण धडे दिले.
शालेय अभ्यासक्रमातील सहावी, सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाविषयी माहिती देण्यासाठी शैक्षणिक उपक्रमांतर्गत तज्ज्ञ मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमशील शिक्षक राजेश साळवे यांनी आनंदराज आंबेडकर यांना विद्यार्थ्यांशी संविधानावर चर्चा करण्याची विनंती केली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत मंगळवारी सकाळी ११ वाजता त्यांनी ऑनलाइन संवाद साधला.
या वेळी आनंदराज आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया, त्याची उपयुक्तता आणि सामाजिक महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली. संविधानामुळे महिलांना व वंचित घटकांना कसे हक्क व संधी मिळाल्या, तसेच समाजातील दुर्लक्षित घटकांचे अधिकार संविधानाने कशा प्रकारे संरक्षित केले, हे त्यांनी सोप्या शब्दांत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
संवादादरम्यान सहावीतील विद्यार्थिनी अर्पिता जाधव हिला भविष्यातील ध्येय विचारले असता तिने आयएएस अधिकारी होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर आनंदराज आंबेडकर यांनी आयएएस परीक्षेबाबत मार्गदर्शन करून तिला शुभेच्छा व आशीर्वाद दिले. मोबाईल स्पीकरच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी सवणा येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेवर सखोल मार्गदर्शन केले होते. या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थोर व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा थेट लाभ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
