देऊळगाव राजा :-
स्थानिक समर्थ कृषी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) एककाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पदवी शिक्षणासोबतच कौशल्य विकास व प्रात्यक्षिक ज्ञान आत्मसात करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. बदलत्या काळात केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता बहुआयामी कौशल्ये विकसित केल्यास करिअरमध्ये यश निश्चित मिळते, असे त्यांनी नमूद केले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले डॉ. सुहास लांडे यांनी विद्यार्थ्यांना शेती तंत्रज्ञानातील आधुनिक संधी, पदवीनंतर उपलब्ध असलेल्या विविध विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षा तसेच करिअरच्या विविध पर्यायांबाबत सखोल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी, क्षमता व बाजारपेठेतील संधी यांचा विचार करून योग्य करिअरची निवड करावी, तसेच यशस्वी करिअरसाठी आवश्यक कौशल्ये व ज्ञान आत्मसात करावे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्रा. योगेश चगदळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अरुण शेळके यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकता, एकात्मता व देशभक्ती या विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रा. किशोर कवर, प्रा. सचिन सोळंकी यांच्यासह इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.