बुलढाणा प्रतिनिधी –
खंडणीची मागणी, सरकारी कामात अडथळा आणणे तसेच महिलेचा विनयभंग केल्याच्या गंभीर आरोपांखाली अटक करण्यात आलेल्या पत्रकार अजहर शेख यांची बुलढाणा जिल्हा सत्र न्यायालयाने दि. २२ जानेवारी रोजी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, प्राथमिक आरोग्य केंद्र, एकलारा (ता. चिखली) येथे कार्यरत असलेल्या एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दि. ३० सप्टेंबर २०२३ रोजी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत त्यांनी नमूद केले होते की, ओपीडी ड्युटी सुरू असताना आरोपी अजहर शेख यांनी त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणला, शिवीगाळ केली, झटापट केली तसेच विनयभंग केला. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती व न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
या प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. राज मोहम्मद शेख यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, तक्रारदाराने केलेले आरोप आकसापोटी व पूर्वग्रहातून प्रेरित असून घटनेच्या ठिकाणी उपस्थित साक्षीदारांच्या जबानींमध्ये मोठ्या प्रमाणावर विसंगती आढळून येते. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्याचा कोणताही ठोस पुरावा किंवा सीसीटीव्ही चित्रीकरण पोलीस सादर करू शकले नाहीत.
विनयभंग व खंडणीच्या आरोपांमध्येही कोणतेही ठोस तथ्य नसून आरोपीला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व सादर पुरावे विचारात घेत न्यायालयाने सरकारी पक्ष आरोपीविरुद्ध आरोप सिद्ध करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे नमूद केले. परिणामी, न्यायालयाने पत्रकार अजहर शेख यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता करत सरकारी पक्षावर ताशेरे ओढले.
खंडणी, सरकारी कामात अडथळा व विनयभंग प्रकरणी पत्रकार अजहर शेख यांची सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
0
9
5
5
4
3
Users Today : 1
Leave a comment