साखरखेर्डा: प्रजासत्ताक दिन उत्सवांमध्ये झेंडावंदन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे रंगतदार दर्शन

KHOZ MASTER
2 Min Read

साखरखेर्डा प्रतिनिधी –
साखरखेर्डा – येथे शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. सकाळी साखरखेर्डा नगरी विद्यार्थ्यांच्या घोषणांनी दुमदुमून गेली. अनेक ठिकाणी झेंडावंदन केले गेले, तर सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे मन जिंकले.
अनिकेत सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी “आपली मुलगी सुरक्षित आहे का!” या विषयावर प्रत्येक चौकात पथनाट्य सादर केले. जिजामाता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासून आपली कला सादर केली. एस ई एस हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी देखील प्रत्येक ठिकाणी पथनाट्य सादर करून प्रजासत्ताक दिनाची महती अधोरेखित केली.
सकाळी सात वाजता साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार गजानन करेवाड यांच्या हस्ते झेंडावंदन झाले, त्यानंतर पोलिसांनी सलामी दिली. यानंतर जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विद्यालय, खाजगी शाळा, सर्व बँका, महसूल अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय याठिकाणी झेंडावंदनाचे कार्यक्रम पार पडले.
श्री शिवाजी हायस्कूल, एस ई एस हायस्कूल, जिजामाता विद्यालय, सहकार विद्या मंदिर आणि अनिकेत सैनिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे उपस्थितांची मनं जिंकली.
ग्रामीण भागातील विविध कार्यालयांत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, संस्था अध्यक्ष डॉ. निलम महाजन, सचिव चंद्रशेखर शुक्ल, सचिव पंजाबराव हाडे यांनी झेंडावंदन केले. महसूल अधिकारी कार्यालय, भारतीय स्टेट बँक, बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक, प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी संबंधित अधिकारी झेंडावंदनासाठी उपस्थित होते.
या उपक्रमात सरपंच सौ. ज्योती अमित जाधव, संतोष मोरे, ललित अग्रवाल, दिलीप बेंडमाळी, सय्यद रफीक, शेख आयुब कुरेशी, शिक्षक व गावातील नागरिक उपस्थित होते, ज्यांनी कार्यक्रमास विशेष रंगत आणली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *