मलकापूर प्रतिनिधी :
विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर शहरात पुन्हा एकदा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. स्वस्तात दुप्पट-तिप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीला मलकापूर शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. अवघ्या २० हजार रुपयांच्या बदल्यात २ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून दिल्लीतील एका अल्पवयीन मुलाची फसवणूक करण्याचा प्रयत्न या टोळीने केला होता.
ही घटना २९ जानेवारी २०२६ रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास मलकापूर बसस्थानक परिसरात घडली. शहर पोलिसांचे पथक गस्त घालत असताना बसस्थानकाजवळील गल्लीत यश मदनलाल गडरोया (वय १५, रा. नंदनगरी, उत्तर-पूर्व दिल्ली) हा मुलगा घाबरलेल्या व गोंधळलेल्या अवस्थेत आढळून आला.
पोलीस अंमलदार योगेश प्रभाकर तायडे व त्यांच्या पथकाने त्याची विचारपूस केली असता धक्कादायक प्रकार उघड झाला. मलकापूर शहरातील भीमनगर परिसरातील रहिवासी आनंद संतोष इंगळे (वय २३) व रोहित रतन महाले (वय २२) यांनी या अल्पवयीन मुलाला गाठून “२० हजार रुपये दे, बदल्यात २ लाख रुपये मिळतील” असे आमिष दाखवले होते. मात्र देण्यात येणाऱ्या नोटा या खऱ्या चलनी नोटा नसून ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’च्या बनावट खेळण्यातील नोटा असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हा फसवणुकीचा डाव हाणून पाडला व दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणामुळे मलकापूर शहरात नकली नोटांचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने आरोपींनी हा मार्ग अवलंबल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी पोलीस अंमलदार योगेश तायडे यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (२) व ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वारे करीत आहेत. आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
Users Today : 3