पंचायत समितीच्या आवारातील जलकुंभ ठरला शोभेची वास्तू लाखो रुपये खर्चून उभारलेली पिण्याच्या पाण्याची सुविधा निष्क्रिय

Khozmaster
2 Min Read

देऊळगाव राजा प्रतिनिधी :

ग्रामीण भागातील जनतेच्या विविध समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी तालुकास्तरावर पंचायत समिती ही महत्त्वाची प्रशासकीय यंत्रणा आहे. दररोज ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक पंचायत समिती कार्यालयात येत असतात. अशा नागरिकांसाठी सुमारे पंधरा वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून पिण्याच्या पाण्यासाठी जलकुंभाची उभारणी करण्यात आली होती. मात्र, अवघ्या एका वर्षानंतरच संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे हा जलकुंभ बंद पडला असून सध्या तो फक्त शोभेची वास्तू ठरत आहे.
देऊळगाव राजा पंचायत समितीच्या आवारात शासनाच्या निधीतून आरसीसी जलकुंभाचे बांधकाम करण्यात आले. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जलकुंभाची देखभाल व देखरेख करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणा प्रमुखांवर असताना, त्यांनी या बाबीकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. परिणामी, जलकुंभ व त्याचा ओटा सध्या बसण्यासाठी किंवा विसाव्यासाठीच वापरला जात आहे.
जलपात्राच्या बाहेरील बाजूस लावण्यात आलेल्या गुळगुळीत टाईल्स अनेक ठिकाणी तुटून पडल्या असून, देखभाल नसल्यामुळे परिसर विद्रूप झाला आहे. पंचायत समिती कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी इकडे-तिकडे भटकावे लागत आहे, ही अत्यंत खेदजनक बाब असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
“पाणी पाजण्यासारखे पुण्य दुसरे नाही,” ही म्हण सर्वांनाच ज्ञात असताना, संबंधित यंत्रणा प्रमुख व त्यांच्या अधीनस्थ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून सदर जलकुंभ सुरू करण्याबाबत संबंधित यंत्रणांना स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी मागणी पंचायत समितीत येणाऱ्या ग्रामीण नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

0 9 4 9 7 2
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *