मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मोरगव्हाण येथे विशेष जनजागृती स्वच्छ ग्राम पुरस्कारानंतर विकासासाठी भरत गणेशपुरेंच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम

Khozmaster
3 Min Read

रिसोड प्रतिनिधी :
तालुक्यातील मोरगव्हाण ग्रामपंचायतीला मुख्यमंत्री मोरगव्हाण समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत स्वच्छ भारत मिशन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत जिल्हास्तरीय तृतीय पुरस्कार नुकताच प्राप्त झाला आहे. या यशानंतर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व जनजागृतीसाठी जिल्हा परिषद विभागाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मराठी सिनेअभिनेते भरत गणेशपुरे हे स्वच्छता दूत म्हणून आपल्या टीमसह मोरगव्हाण येथे आले होते. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत ग्रामस्थांशी संवाद साधत ग्रामविकास, स्वच्छता आणि शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विशेष जनजागृती करण्यात आली.
‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात हास्य पोहोचवणारे भरत गणेशपुरे, आमदार भावनाताई गवळी, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या चमूचे मोरगव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी शेषनारायण कोकाटे, ग्रामविकास अधिकारी देवानंद अंभोरे, उपसरपंच व सदस्य यांचे ग्रामस्थांनी बैलगाडी मिरवणुकीतून जल्लोषात स्वागत केले.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात गटविकास अधिकाऱ्यांनी गावात सुरू असलेल्या विविध विकासात्मक कामांची माहिती दिली. त्यानंतर भरत गणेशपुरे व शासकीय चमूने ग्रामपंचायत हद्दीतील
– प्लास्टिक कचरा व्यवस्थापन,
– घरांच्या दरवाजांवरील क्यूआर कोड,
– स्मशानभूमीतील फळबाग व वृक्षारोपण,
– गांडूळ खत प्रकल्प,
– हँडवॉश स्टेशन,
– हरिदास जाधव यांच्या शेतातील शेडनेट व जलतारा,
– टोमॅटो प्रकल्प, पाणीपुरवठा टाकी,
– गुलाब लागवड व बचत गटांचे स्टॉल
यांची पाहणी करून सविस्तर माहिती घेत मार्गदर्शन केले.
यावेळी पंचक्रोशीतील हजारो नागरिकांना संबोधित करताना भरत गणेशपुरे यांनी विनोदाच्या माध्यमातून विकासाचे महत्त्व पटवून दिले. “मोरगव्हाण गाव अतिशय वेगाने पुढे जात आहे. शासनाच्या पाच कोटी रुपयांच्या बक्षिसापासून आपण अवघ्या काही पावलांवर आहात. आम्ही नाईन्टीवर विश्वास ठेवत नाही, आम्हाला फुल्ल पाहिजेत!” असे म्हणत त्यांनी उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ निर्माण केला.
आमदार भावनाताई गवळी यांनी ग्रामपंचायतीच्या विकासकामांचे कौतुक करत विकास निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी कालिदास तापी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी योगेश क्षीरसागर, पाणीपुरवठा उपमुख्य कार्यकारी अधिकारी धैर्यशील पाटील, वाशीमचे गटविकास अधिकारी रविंद्र सोनुने, गजानन खुळे, बीईओ बी.एल. कोकाटे, यशदाचे राज्य प्रशिक्षक प्रविण पट्टेबहादुर, राम शृंगारे, विस्तार अधिकारी भुसारे, साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी गावातील प्रत्येक रस्त्यावर वारकरी युवक टाळ-मृदंग घेऊन पाहुण्यांच्या स्वागतासाठी उभे होते, हे विशेष आकर्षण ठरले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक प्रमोद गरकळ यांनी केले, तर सचिव देवानंद अंभोरे यांनी आभारप्रदर्शन केले.

0 9 4 9 7 2
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *