कामाचा माणूस… कायम स्मरणात राहील” स्व. अजितदादा पवारांना राहुल बोंद्रे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

Khozmaster
2 Min Read

चिखली प्रतिनिधी :
महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कामातून स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, प्रशासनावर मजबूत पकड असलेले आणि जनतेच्या प्रश्नांसाठी कायम धावणारे कर्तव्यदक्ष नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व कायम स्मरणात राहील, असे भावनिक उद्गार माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी काढले.
२०१३ सालचा एक प्रसंग आठवताना बोंद्रे यांनी सांगितले की, चिखली विधानसभा मतदारसंघातील पहिल्या कार्यकाळात वाढत्या दुष्काळामुळे व तीव्र पाणीटंचाईमुळे राम नदीवर अवलंबून असलेल्या हातणीसह परिसरातील १३ गावांवर मोठे संकट ओढवले होते. शेतकरी हवालदिल झाला होता आणि पाण्यासाठी गावोगावी संघर्ष सुरू होता. ही परिस्थिती लक्षात घेत “भगीरथ जलसंजीवनी प्रकल्प” या नदी खोलीकरणाच्या लोकचळवळीची सुरुवात करण्यात आली.
ही केवळ शासकीय योजना नव्हती, तर लोकांच्या सहभागातून उभी राहिलेली प्रभावी लोकचळवळ होती. श्रमदान, बैठका आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या चळवळीने व्यापक रूप धारण केले. त्याकाळी राज्यात काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असून, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होते.
या प्रकल्पाची माहिती मिळताच अजितदादा पवार यांनी स्वतः फोन करून, “राहुल, तुम्ही हाती घेतलेली ही महाचळवळ मी स्वतः येऊन पाहणार आहे,” असे सांगितले. त्यानुसार ते ग्राम हातणी, ता. चिखली येथे आले. संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करून त्यांनी सहभागी सहकाऱ्यांचे कौतुक केले आणि या उपक्रमाचे कौतुक करत पाठ थोपटली.
त्यानंतर मतदारसंघातील विविध कामांनिमित्त अजितदादांची भेट घेतली असता कामे तत्काळ मार्गी लागत असत. इतकेच नव्हे, तर इतर मंत्र्यांनाही ते भगीरथ जलसंजीवनी प्रकल्पाचा उल्लेख करत, तो आदर्श उदाहरण म्हणून दाखवत असत.
२८ जानेवारी रोजी सकाळी अजितदादांच्या विमान अपघाताची बातमी समजताच क्षणभर विश्वास बसला नाही. मात्र त्यांच्या निधनाची बातमी कळताच मन सुन्न झाले. त्या क्षणी एकच वाक्य मनातून बाहेर पडले — “कामाचा माणूस गेला.”
स्व. अजितदादा पवार यांनी कधीही पक्ष, जात किंवा धर्म पाहून राजकारण केले नाही. काम होणार असेल तर क्षणात करून द्यायचे आणि न होणार असेल तर स्पष्ट सांगायचे, ही त्यांची कार्यशैली होती. वक्तशीर, शिस्तप्रिय, कडक पण न्यायप्रिय असा नेता महाराष्ट्राला पोरका करून निघून गेला, ही जाणीव आजही मनाला स्वीकारता येत नाही.
महाराष्ट्रासाठीची त्यांची धडपड, नेतृत्व आणि सहकाऱ्यांवरील विश्वास कायम स्मरणात राहील, असे सांगत माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

0 9 4 9 7 2
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *