ग्रामपंचायत कार्यालयात स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Khozmaster
2 Min Read

जानेफळ प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या विमान दुर्घटनेतील अकाली निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, ३० जानेवारी रोजी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली.
यावेळी सरपंच सौ. रूपाली वडणकर यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
श्रद्धांजली सभेत पत्रकार प्रा. कृष्णा हावरे, पत्रकार गणेश सवडतकर, मनीष मांडवगडे, विशाल फितवे यांनी शोकसंवेदना व्यक्त करताना स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्याची व समाजाची मोठी, न भरून निघणारी हानी झाल्याचे सांगितले. “कामाचा माणूस” अशी त्यांची ओळख होती. प्रशासनावर त्यांची उत्तम पकड होती, असे मत त्यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ शेतकरी नेते गजानन तात्या कृपाळ यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना स्व. अजितदादा पवार यांचा रोखठोक स्वभाव, कामाप्रती असलेली निष्ठा आणि विकासाची दूरदृष्टी अधोरेखित केली. असे नेतृत्व आपल्यातून निघून गेल्याने राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याची भावना त्यांनी साश्रूनयनांनी व्यक्त केली. त्यांच्या भाषणादरम्यान उपस्थितांचे डोळे पाणावले.
यावेळी उपसरपंच विजय कृपाळ, ग्रामसचिव विलास गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य गजानन वडणकर, सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना नेते मोहन धोटे, सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर मुरडकर, कृषी सहाय्यक लाड, शिवसेना शहरप्रमुख व सदस्य मंटू राजुरकर, पत्रकार अमर राऊत, ग्रामपंचायत सदस्य भरत घायवट, संजय सुरजुसे, देवेंद्र आदमाने, कावेरी जाधव, विजय दांडगे, राजेश ठाकरे, मोहसीन शेख, सुरेश काठोळे, उमेश डव्हळकर, मंगेश कुलकर्णी, प्रसाद फिरके, विजय काळे, गजानन उंबरकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व सामाजिक, धार्मिक, राजकीय व विविध क्षेत्रातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व. अजितदादा पवार हे उत्तम प्रशासक, कामाचा माणूस आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. त्यांच्या निधनाने राज्याचे मोठे नुकसान झाले आहे, अशी भावना सर्व उपस्थितांनी व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

0 9 4 9 6 9
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *