डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या समृद्धी महामार्गावर चालकाला झोपेची डुलकी लागल्याने ट्रक पलटी होऊन रस्त्याखाली गेल्याची घटना ३० जानेवारी २०२६ रोजी घडली. या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, समृद्धी महामार्गावरील पॅनल क्रमांक २६८, नागपूर कॉरिडॉरवर मुंबईकडून नागपूरकडे जाणारा ट्रक (क्रमांक डब्ल्यू.बी. २३ – ई ६४१७) दुपारी प्रवासात असताना चालकाला झोपेची डुलकी लागली. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ट्रक पलटी होऊन महामार्गाखाली गेला.
या अपघातात ट्रक चालक सुनील कुमार मोरया हा किरकोळ जखमी झाला. सदर ट्रकमध्ये पोत्यांचा बारदाना भरलेला होता. अपघाताची माहिती मिळताच डोणगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रकमधून चालक व वाहक यांना सुरक्षितरित्या बाहेर काढून उपचारासाठी मेहकर येथे पाठवले.
दरम्यान, ट्रक महामार्गाखाली गेल्याने व त्यातील मालाची चोरी होऊ नये यासाठी डोणगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून सुरक्षा व्यवस्था ठेवली. पुढील तपास डोणगाव पोलीस करत आहेत.
Users Today : 0