अखिल भारतीय ग्राहक पंचायत व जागृती मंचचा विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न

Khozmaster
2 Min Read

छत्रपती संभाजीनगर : अखिल भारतीय ग्राहक पंचायत व जागृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी रोजी गणतंत्र दिन व वसंत पंचमी निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी सौ. रेखा बासरकर यांनी वसंत पंचमीचे महत्त्व विशद करताना सौंदर्य व सर्जनशीलता या मानवी जीवनात सत्कर्मातून आनंद व उत्साह निर्माण करतात आणि जीवनाला गती देतात, असे सांगितले. सरस्वती ही बुद्धीची देवता मानली जाते, त्यामुळे मन व बुद्धीवर ताबा ठेवून सामाजिक नियंत्रण कसे सांभाळावे याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

तसेच ७७ व्या गणतंत्र दिनानिमित्त प्रत्येक सुजाण नागरिकाने “माझा देश मी किती स्वच्छ ठेवू शकतो”, स्वच्छतेतून विकासाचा मंत्र कसा जपू शकतो आणि स्वच्छतेद्वारे निरामय आरोग्याचे सामाजिक स्तरावर संरक्षण कसे करता येईल, याबाबत वैयक्तिक संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात नवनियुक्त नगरसेविका सविता कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहराचे सौंदर्यीकरण कसे करता येईल व विद्रुपीकरण कसे थांबवता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. नागरिकांची सामाजिक जबाबदारी काय आहे आणि ती जबाबदारी पूर्णत्वास कशी न्यावी, यावर यावेळी सविस्तर चर्चा झाली. प्रत्येकाने खारीचा वाटा उचलून भारत देशाला समृद्ध बनवावे, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतमातेच्या प्रतिमेस वंदन करून प्रार्थना घेण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन भारती भांडेकर विश्वास (अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत व जागृती मंच) व ॲड. ज्योती पत्की (जिल्हाध्यक्ष) यांनी केले. या कार्यक्रमास शहरातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

0 9 4 9 6 9
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *