जिंतूर : डोंगरतळा शिवारातील कमळजाई देवी मंदिर परिसरातील निर्जन भागात महिलां व तरुणींचा विनयभंग करून मोबाईल व रोख रक्कम लुटण्याच्या घटना घडत होत्या. मात्र भीतीपोटी कोणतीही तक्रार दाखल होत नसल्याने हे गंभीर प्रकरण दीर्घकाळ अंधारात होते.
दरम्यान, या घटनांबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या संमतीने पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंड व बिट जमादार दत्तात्रय गुंगाने यांच्या मदतीने अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास करत सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणात फिर्यादी शोधणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र परिसरात कसून शोधमोहीम राबवून अखेर एका पीडितेचा शोध घेण्यात आला व पहिला गुन्हा दाखल करण्यात यश आले. पुढील तपासात आरोपींनी यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर आणखी एका महिलेचा शोध घेऊन दुसरा विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला.
या संपूर्ण प्रकरणातील धाडसी, संयमित व कौशल्यपूर्ण तपासाची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंड व बिट जमादार दत्तात्रय गुंगाने यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविले.
या सन्मानामुळे जिंतूर शहरासह ग्रामीण भागात पोलिसांच्या कार्याबद्दल समाधान व कौतुक व्यक्त करण्यात येत असून, नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे.
Users Today : 0