आंबेपूर : आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने जोरदार प्रचार सुरू असून, झालेल्या प्रचार सभेला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी शिवसेनेच्या उमेदवार रसिका केणी यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन शिवसेना नेते दिलीपशेठ भोईर यांनी केले.
सभेत बोलताना भोईर म्हणाले की, आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघाला विकासाची खरी दिशा देण्यासाठी शिवसेनेच्या हक्काच्या उमेदवारालाच संधी देणे गरजेचे आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी आणि जि.प. उमेदवार रसिका केणी हे नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी चोवीस तास उपलब्ध असतात. त्या सातत्याने मतदारांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या जाणून घेतात व त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात. त्यामुळे जनतेच्या हक्कासाठी काम करणाऱ्या उमेदवाराला आता बहुमताने निवडून देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भोईर यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली. “या मतदारसंघातून पूर्वी शेतकरी पक्षात असलेले व सध्या भाजपमध्ये गेलेले काही नेते अनेक वर्षे सत्तेत होते. मात्र, सत्तेचा उपभोग घेऊनही त्यांनी मतदारसंघात ठोस विकासकामे केली नाहीत. रस्ते, पाणी, आरोग्य व शिक्षण यांसारखे मूलभूत प्रश्न आजही जैसे थे आहेत. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मतदारसंघाचा अपेक्षित विकास झाला नाही,” असा आरोप त्यांनी केला.
आंबेपूर मतदारसंघातील रखडलेले प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम, काम करणारी व जनतेशी थेट नाते असलेली उमेदवार आवश्यक असल्याचे सांगत भोईर म्हणाले की, शिवसेनेच्या उमेदवार रसिका केणी या केवळ निवडणुकीपुरत्याच नव्हे, तर कायम जनतेसोबत उभ्या राहणाऱ्या नेत्या आहेत. “जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारी व प्रत्येक अडचण आपली समजून सोडवणारी उमेदवार म्हणजे रसिका केणी,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
अलिबाग–मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात विकासकामांचा धडाका सुरू असल्याचा उल्लेख करत भोईर म्हणाले की, शिवसेनेने विविध विकासकामे मार्गी लावल्याने जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक सदस्य निवडून येऊन जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सभेच्या शेवटी मतदारांनी एकदिलाने रसिका केणी यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. सभेदरम्यान उपस्थित नागरिकांनी मोठ्या उत्साहात शिवसेनेच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला व रसिका केणी यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला
Users Today : 0