स्विफ्ट डिझायरच्या धडकेत महिला मजूर ठार; आठ जखमी

Khozmaster
1 Min Read

लोणार, दि. १ (प्रतिनिधी):
तालुक्यातील किनगावजटू येथून मातमळकडे नेटसेटच्या कामासाठी जाणाऱ्या महिला मजुरांच्या ऑटोला भरधाव वेगातील स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका महिला मजुराचा मृत्यू झाला, तर अन्य आठ जण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि. १) सकाळी सुमारे ८ वाजता सरस्वती नदीजवळ बाजड यांच्या शेताजवळील वळणावर घडली.

एमएच-२८-आर-२२११ क्रमांकाच्या ऑटोमध्ये महिला मजूर बसून जात असताना सरस्वतीकडून येणाऱ्या एमएच-४३-एएफ-५८२१ क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने ऑटोला जोरदार धडक दिली. धडकेमुळे ऑटो पलटी होऊन महिलामजूर रस्त्याच्या कडेला फेकल्या गेल्या.

या अपघातात जरीनाबी अय्युबशहा (वय ४५) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर रंजना परमेश्वर कास्तोडे (५३), शांताबाई शेवाळे (४५), कल्पना विठ्ठल जमधाडे (४०), अलका मधुकर शेवाळे (४०), लक्ष्मण बबन करवते (४५), चंद्रभागा गजानन नागरे (४०), राधा गजानन गायकवाड तसेच ऑटोचालक आसिफ निशालशहा (३०) हे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला असून संबंधित कार हिवराखंड येथील असल्याचे समजते. माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेने जखमींना लोणार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर काही जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून लोणार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

0 9 4 9 6 9
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *