मेहकर तालुक्यातील २५ गावे रेशन धान्यापासून वंचित मकर संक्रांत व प्रजासत्ताक दिनीही धान्य नाही; लाभार्थी त्रस्त पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

KHOZ MASTER
2 Min Read

डोणगाव, दि. १ (प्रतिनिधी)
मेहकर तालुक्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली पूर्णतः कोलमडली असून गोरगरीब नागरिकांना मागील तीन महिन्यांपासून निकृष्ट दर्जाचे रेशन धान्य मिळत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यातच डोणगाव येथील गोडाऊनवरून रेशन पुरवठा होणाऱ्या तब्बल २५ गावांतील लाभार्थ्यांना मकर संक्रांत व राष्ट्रीय सण असलेल्या प्रजासत्ताक दिनालाही रेशन धान्य मिळाले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मेहकर तालुक्यात रेशन मालाच्या वितरणासाठी दोन गोडाऊन असून, मेहकर येथील गोडाऊनवरून १३६ रेशन दुकानदारांना तर डोणगाव येथील गोडाऊनवरून ३८ रेशन दुकानदारांना धान्याचा पुरवठा केला जातो. नियमानुसार महिन्याच्या सुरुवातीलाच रेशन धान्याचा पुरवठा होणे अपेक्षित असताना डोणगाव गोडाऊनच्या कार्यप्रणालीमुळे मोठ्या प्रमाणावर विलंब होत आहे.

डोणगाव गोडाऊनवरील ३८ रेशन दुकानदारांपैकी केवळ १३ दुकानदारांना २४ जानेवारी रोजी ज्वारीचा पुरवठा करण्यात आला, तर उर्वरित २५ दुकानदारांना अद्यापही ज्वारी मिळालेली नाही. त्यामुळे संबंधित २५ गावांतील नागरिकांना रेशन धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.

विशेष म्हणजे १३ दुकानदारांना मिळालेली ज्वारीसुद्धा निकृष्ट दर्जाची व खाण्यायोग्य नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यापूर्वी ३१ डिसेंबर २०२६ रोजी ज्वारी मिळाल्यानंतरही पॉस (POS) मशीन बंद असल्यामुळे वाटप होऊ शकले नाही. पॉस मशीनमध्ये आवश्यक डेटा उपलब्ध झाल्यानंतरच वाटप सुरू होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सणासुदीच्या काळातही रेशन न मिळाल्याने गोरगरीब जनतेचे हाल होत असून, मेहकर तालुक्यातील पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करावी, जेणेकरून निकृष्ट दर्जाचे धान्य येणार नाही व लाभार्थ्यांना वेळेवर रेशन धान्य मिळू शकेल, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

0 9 7 2 6 6
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *