खामगाव, दि. १ (प्रतिनिधी) –
शहरातील बर्डे प्लाट परिसरात मुलीच्या हळदीच्या कार्यक्रमादरम्यान दारूच्या नशेत आलेल्या पित्याने घरात गोंधळ घालत फरशीचा तुकडा मारून स्वतःच्याच मुलीच्या डोक्यात घाव घातल्याची धक्कादायक घटना ३१ जानेवारी रोजी दुपारी घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बर्डे प्लाट परिसरात राहणाऱ्या नजरानाबी जावेद खान (वय ४०) यांचा पती जावेद खान बुढन खान हा नेहमी दारू पिऊन पत्नी व मुलांसोबत वाद घालत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. ३१ जानेवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास फिर्यादीच्या घरी मुलगी मेहेक परवीन (वय १८) हिच्या विवाहानिमित्त हळदीचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी नातेवाईक व पाहुणे उपस्थित असताना आरोपी दारूच्या नशेत तेथे आला व कार्यक्रम बंद करण्यास सांगत वाद घालू लागला.
वाद वाढल्यानंतर आरोपीने फिर्यादीचा लहान मुलगा नवाज खान याला मारहाण करण्यास सुरुवात केली. भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी व मुलगी मेहेक परवीन यांनी हस्तक्षेप केला असता, आरोपीने जमिनीवर पडलेला फरशीचा तुकडा उचलून मेहेक परवीन हिच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात तिच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला. तसेच आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले. मात्र आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी नजरानाबी जावेद खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी जावेद खान बुढन खान (रा. बर्डे प्लाट, खामगाव) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ३५२, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.
Users Today : 138