देऊळगाव राजा, दि. १ (प्रतिनिधी) –
शहरातील नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण करणे हा मोटारसायकल रॅलीचा मुख्य उद्देश आहे. आगामी काळात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी नियमांचे पालन करून स्वतःचे व इतरांचे जीवन सुरक्षित ठेवावे, कारण रस्ता सुरक्षा ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी केले.
संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात १ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘सडक सुरक्षा, जीवन सुरक्षा’ या व्यापक रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन देऊळगाव राजा यांच्या वतीने शहरात मोटारसायकल रॅली काढून वाहतूक सुरक्षेबाबत सखोल जनजागृती करण्यात आली. ही रॅली पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, तसेच अंढेरा व किनगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे व संजय मातोंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. देऊळगाव राजा उपविभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोटारसायकल रॅली शहरातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आली. रॅलीदरम्यान नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेटचा वापर, १८ वर्षांखालील मुलांनी वाहन चालवू नये, वेगमर्यादा पाळणे व सुरक्षित अंतर ठेवणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्देश केवळ नियम पाळण्यापुरता नसून मानवी जीवन व प्राण वाचवणे हाच असल्याचे पोलिसांनी यावेळी स्पष्ट केले.
या रॅलीच्या माध्यमातून शहर व परिसरातील नागरिकांपर्यंत रस्ता सुरक्षा व जीवन सुरक्षा याविषयीचे संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आले. आपल्या छोट्या सावधगिरीमुळे मोठे अपघात टाळता येतात, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी शेवटी केले.
Users Today : 138