डोणगाव, दि. २ (प्रतिनिधी)
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) हा भारत सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणारा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्यविषयक समस्या लवकर ओळखून त्यावर उपचार करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्रात हा कार्यक्रम १ एप्रिल २०१३ पासून सर्व जिल्ह्यांमध्ये अंमलात आणण्यात आला आहे.
या कार्यक्रमांतर्गत डॉक्टर, आरोग्य सेविका व फार्मासिस्ट यांची नियुक्ती करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी या टीमला अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही तालुक्यांमध्ये बाल स्वास्थ्य कार्यक्रमासाठी नेमलेले डॉक्टर ग्रामीण रुग्णालयांमध्ये ओपीडीसाठी जुंपले जात असल्याने ते अंगणवाडी व शाळांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. परिणामी ग्रामीण भागातील बालकांची नियमित आरोग्य तपासणी होत नसल्याचे चित्र आहे.
याशिवाय मागील काही काळात आरबीएसके टीमच्या जाण्या-येण्यासाठी आवश्यक असलेल्या वाहनांसाठी निधी उपलब्ध नसल्यानेही या टीम ग्रामीण भागात पोहोचण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे जन्मजात दोष, आजार, अॅनिमिया, जीवनसत्त्वांची कमतरता, विकासातील उशीर व अपंगत्व यांचे वेळीच निदान व उपचार होत नसल्याने कार्यक्रमाचा मूळ हेतू धोक्यात आला आहे.
आरबीएसके अंतर्गत शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांची अंगणवाडीत द्विवार्षिक तपासणी, शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तसेच नवजात शिशूंची डिलिव्हरी पॉइंट्सवर तपासणी केली जाते. प्रत्येक मोबाइल हेल्थ टीममध्ये दोन वैद्यकीय अधिकारी (एक महिला व एक पुरुष), एक फार्मासिस्ट व एक आरोग्य सेविका असते.
बुलढाणा जिल्ह्यात एकूण ३३ टीम मंजूर असून त्यासाठी ६६ डॉक्टरांची आवश्यकता आहे. मात्र सध्या पाच डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. तसेच ३३ फार्मासिस्टपैकी सात पदे आणि ३३ आरोग्य सेविकांपैकी सात पदे रिक्त असल्याची माहिती आहे.
जिल्हास्तरावर संदर्भित बालकांसाठी उपचार, शस्त्रक्रिया व पुनर्वसन सुविधा उपलब्ध असून गरजू बालकांना तृतीय स्तरावरील उपचार व शस्त्रक्रिया मोफत दिल्या जातात. एप्रिल ते डिसेंबर २०२५ या कालावधीत हर्निया, हायड्रोसील, टंग टाय, डोळ्यांचा तिरळेपणा, जन्मजात गाठी आदी विविध आजारांवर २७१ बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
महिला व बाल विकास विभाग तसेच शिक्षण विभागाच्या समन्वयातून हा कार्यक्रम राबवला जात असला, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी दूर न झाल्यास ग्रामीण भागातील बालकांचे आरोग्य जपणे कठीण होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
Users Today : 138