श्रींच्या १४८ व्या प्रगटदिन उत्सवास उत्साहात सुरुवात संस्थानमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम; भाविकांची मोठी गर्दी

KHOZ MASTER
2 Min Read

शेगाव, दि. २ (प्रतिनिधी)
“चला हो शेगावी जाऊ, जिवाचा जिवलगा पाहू…”
या भक्तिभावपूर्ण वातावरणात श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये श्रींच्या १४८ व्या प्रगटदिन उत्सवास आज, २ फेब्रुवारीपासून भक्तिभावात सुरुवात झाली. यानिमित्त सकाळी ११ वाजता श्री महारूद्रस्वाहाकार यागाचे पूजन करण्यात आले. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

प्रगटदिन उत्सवानिमित्त सात दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी ५ ते ६ काकडा, सकाळी ७.१५ ते ९.१५ भजन, सायंकाळी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५.३० ते ६ हरिपाठ तसेच रात्री ८ ते १० कीर्तन होणार आहे.

कीर्तन महोत्सवात नामवंत कीर्तनकार सहभागी होणार असून २ फेब्रुवारी रोजी हभप रामबुवा डोंगरे (जाटनांदुर), ३ फेब्रुवारी हभप मनोजबुवा कुलकर्णी (पिंप्राळा), ४ फेब्रुवारी हभप अनिरुद्धबुवा क्षीरसागर (सावरगाव), ५ फेब्रुवारी हभप बळीरामबुवा दौंड (शिवर), ६ फेब्रुवारी हभप संभाजीबुवा मेहुणकर (धाराशिव), ७ फेब्रुवारी हभप मयूरबुवा बोडखे (श्रीक्षेत्र देहू) तर ८ फेब्रुवारी रोजी हभप श्रीहरीबुवा वैष्णव (जालना) व हभप श्रीरामबुवा ठाकूर (लातूर) यांचे कीर्तन होणार आहे. याच दिवशी सकाळी १० ते १२ हभप भरतबुवा पाटील (म्हैसवाडी) यांचे ‘शेगावी श्रींच्या प्रागट्या’ निमित्त कीर्तन होईल.

२ फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्यातील वेदमूर्ती ब्राह्मणवृंदांच्या वतीने श्री महारूद्रस्वाहाकार यागाचे पूजन करण्यात आले. यानिमित्त मंदिर व परिसरात केळीचे खांब व आंब्याच्या पानांची तोरणे लावून आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता महारूद्रस्वाहाकार यागाची पूर्णाहुती व अवभूतस्नान होणार आहे. सायंकाळी ४ वाजता उत्सवांची पालखी अश्व, रथ व मेणासह नगरपरिक्रमेकरिता निघणार आहे. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ८ हभप रवींद्रबुवा हरणे (मुक्ताईनगर) यांचे काल्याचे कीर्तन होईल.

प्रगटदिन उत्सवात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातून भजनी दिंड्या शेगावात दाखल होत असून संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे.

मंदिरावर विद्युत रोषणाई

प्रगटदिनानिमित्त श्रींच्या समाधी मंदिरावर, प्रवेशद्वारावर तसेच संपूर्ण संस्थान परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून रात्रीच्या वेळी मंदिर परिसर अधिकच लोभस दिसत आहे.

0 9 7 2 6 6
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *