देऊळगाव राजा, दि. २ (प्रतिनिधी)
देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर अहोरात्र सज्ज असलेल्या भारतीय जवानांचे शौर्य, धाडस व कठोर प्रशिक्षण यांचे जिवंत दर्शन देऊळगाव मही येथील सहकार विद्या मंदिरच्या विद्यार्थिनींनी आपल्या अंगावर काटा आणणाऱ्या साहसी प्रात्यक्षिकांद्वारे घडवून आणले. देशसेवेची प्रेरणा देणाऱ्या या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी दोरीच्या साहाय्याने उंचावरून खाली उतरणे, संतुलन राखत हालचाली करणे तसेच संकटाच्या प्रसंगी सैनिक ज्या पद्धतीने कार्य करतात त्याचे अनुकरण करत थरारक प्रात्यक्षिके सादर केली. ही प्रात्यक्षिके पाहताना प्रेक्षकांचे लक्ष क्षणभरही हटत नव्हते.
सीमेवरील प्रतिकूल परिस्थितीत जवान आपले कर्तव्य कसे बजावतात, याचा अनुभव देणारे सादरीकरण विद्यार्थिनींनी अत्यंत आत्मविश्वासाने करून दाखवले. या उपक्रमामागे विद्यार्थिनींमध्ये देशसेवा, शिस्त, धैर्य, आत्मसंयम व संघभावना निर्माण करण्याचा उद्देश होता. अनेक दिवसांच्या सरावानंतर हे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले असून विद्यार्थिनींचे साहस व कौशल्य त्यांच्या कठोर प्रशिक्षणाचे फलित असल्याचे स्पष्ट दिसून आले.
हा कार्यक्रम सहकार विद्या मंदिरचे प्राचार्य प्रकाश इंगळे व आप्पाराव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थिनींना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी मेजर अशोक चेके व संतोष गूमलाडू यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांनी विद्यार्थिनींना सैनिकांच्या जीवनशैलीबरोबरच शिस्तीचे महत्त्व व संकटसमयी घेतल्या जाणाऱ्या निर्णयांविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी विद्यार्थिनींच्या धाडसाचे भरभरून कौतुक करत टाळ्यांच्या गजरात दाद दिली. विशेषतः मुलींनी अशा धाडसी प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतल्याने महिला सक्षमीकरणाचे प्रभावी उदाहरण समाजासमोर आले असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
प्रेरणादायी उपक्रम
सहकार विद्या मंदिरने राबवलेला हा उपक्रम केवळ शालेय कार्यक्रम न राहता देशप्रेम, राष्ट्रभक्ती व भावी पिढी घडविण्याचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला. भविष्यात अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी सैन्य, पोलीस व संरक्षण क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित होतील, असा विश्वास देऊळगाव महीच्या सरपंच ज्योत्स्ना वासुदेव शिंगणे यांनी व्यक्त केला.
Users Today : 138