बिबट्याने निलगायीचा फडशा पाडला कोथळी शिवारातील घटना; शेतकरी भयभीत

KHOZ MASTER
2 Min Read

मोताळा, दि. २ (प्रतिनिधी)
मोताळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत असून तळणी, सारोळापीर, सारोळा मारोती, रोहिणखेड, भोरटेक, पिंपळपाटी आदी भागात जनावरांवर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, ३१ जानेवारीच्या रात्री कोथळी शिवारात बिबट्याने अडीच वर्षांच्या निलगायीचा (रोही) फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोताळा वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील कोथळी गावाजवळील पश्चिम बिट परिसरात प्रकाश सरोदे यांच्या शेताजवळ असलेल्या वानखडे यांच्या शेतात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच मोताळा वनविभागाचे वनपाल पी. एस. साडोक, कोथळी बिटचे वनरक्षक बाळासाहेब घुगे यांच्यासह वनकर्मचारी व शेतकरी घटनास्थळी दाखल झाले.

पलढग प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने पलढग, तरोडा व कोथळी परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा, मका आदी पिकांची लागवड केली आहे. पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री उशिरापर्यंत शेतात जावे लागत असल्याने बिबट्याच्या मुक्त संचारामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहेत.

वनविभागाकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रात्री शेतात जाताना एकटे न जाता दोन-तीन जणांनी किंवा समूहाने जावे, मोबाइलवर गाणी लावून किंवा मोठा आवाज करून हालचाल करावी, टॉर्च, काठी व इतर संरक्षणाची साधने जवळ ठेवावीत. तसेच हिंस्त्र प्राण्यांना शेणाचा वास येत असल्याने जनावरे गोठ्यातच बांधावीत, असे आवाहन मोताळा वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एस. अळसपुरे यांनी केले आहे.

दरम्यान, बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे वनविभागाने तातडीने हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

0 9 7 2 6 6
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *