बीडीसीसी बँकेचे शाखाधिकारी अपघातात ठार उदयनगर–बुलढाणा मार्गावरील डासाळानजीक घटना

Khozmaster
1 Min Read

उदयनगर, दि. २ (प्रतिनिधी)
जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या (बीडीसीसी) उदयनगर शाखेचे व्यवस्थापक विजय आराख यांचा अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात ३१ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे पावणेसातच्या सुमारास उदयनगर–बुलढाणा मार्गावरील डासाळानजीक घडला.

विजय माधव आराख (वय ५७) असे मृत शाखाधिकाऱ्यांचे नाव असून ते बुलढाणा शहरातील सावित्रीबाई फुलेनगर येथील रहिवासी होते. ते जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या उदयनगर शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.

शासनस्तरावरून थकीत व चालू कर्जदारांच्या याद्या मागविण्यात आल्याने संबंधित कामकाजासाठी ते कार्यालयात थांबले होते. ३१ जानेवारी रोजी शाखेचे दैनंदिन कामकाज व याद्यांचे काम पूर्ण करून संध्याकाळी ते एमएच-२८-एडब्ल्यू-६३०५ क्रमांकाच्या दुचाकीने घराकडे निघाले असता, अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. दरम्यान, संबंधित वाहनाने अन्य एक व्यक्तीलाही उडविल्याची माहिती आहे.

अपघातानंतर टोलनाक्यावर उपलब्ध रुग्णवाहिकेद्वारे त्यांना तातडीने बुलढाणा येथे उपचारार्थ नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

या दुर्दैवी घटनेमुळे बँक कर्मचारी वर्गासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध घेण्याचे काम पोलीस करीत आहेत.

0 9 4 9 6 6
Users Today : 138
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *