मंगरूळ नवघरे प्रतिनिधी :
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) २०२४-२५ व २०२५-२६ अंतर्गत मंगरूळ नवघरे येथे मंजूर घरकुल लाभार्थ्यांच्या बांधकामांची ३१ जानेवारी रोजी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीसाठी ग्रामपंचायत मंगरूळ नवघरेचे सचिव, ग्रामपंचायत सदस्य तसेच गृहनिर्माण अभियंता श्री. बोर्डे यांनी लाभार्थ्यांच्या घरकुल बांधकाम स्थळी भेट देऊन कामाची प्रगती तपासली.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत मंगरूळ नवघरे व बाभुळगाव या गावांमध्ये यापूर्वी भूमिपूजन करून घरकुल बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे. सदर भेटीदरम्यान सुरू असलेल्या बांधकामांची कामनिहाय पाहणी करण्यात आली. तसेच लाभार्थ्यांच्या घरकुलांचे जीओ-टॅगिंग करून एकूण ५० लाभार्थ्यांची अनुदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
ही पाहणी ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असून, यामुळे लाभार्थ्यांना वेळेत व गुणवत्तापूर्ण घरकुल मिळण्यास मदत होणार आहे. यावेळी लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून कामाच्या प्रगतीबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य नंदू अंभोरे, सदानंद धमक, शेरू, अमोल शिरसाट, निजाम, नितीन जाधव, सतीश पवार, भानुदास पवार आदी उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून सर्व लाभार्थ्यांना लवकरात लवकर हक्काचे घर मिळावे, यासाठी ग्रामपंचायत प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
हिंगणा येथील मराठी प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात
खामगाव प्रतिनिधी :
तालुक्यातील हिंगणा (उमरा) येथील मराठी प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसरपंच ज्योती विलास पवार या होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात सरपंच ज्योती विलास पवार यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रनिर्मितीतील थोर व्यक्तिमत्त्वांच्या कार्याला अभिवादन केले.
स्नेहसंमेलनानिमित्त विविध उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सरपंचांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि आनंदी वातावरणामुळे संपूर्ण कार्यक्रम चैतन्यपूर्ण झाला होता.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षकवर्ग व गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Users Today : 138