तुकाराम महाराज जयंतीनिमित्त शोभायात्रा; हजारो भाविकांना महाप्रसाद

Khozmaster
2 Min Read

तुकाराम महाराज जयंतीनिमित्त शोभायात्रा; हजारो भाविकांना महाप्रसाद

खामगाव, दि. २ (प्रतिनिधी) :
संत शिरोमणी संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त खामगाव शहरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे अद्वितीय दर्शन घडले. कुणबी समाज उत्सव समितीच्या वतीने आयोजित शोभायात्रेमुळे संपूर्ण शहर भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात बुडाले होते. संत तुकाराम महाराज मंगल कार्यालयापासून पालखी सोहळा सुरू झाला.

प्रारंभी संत तुकाराम महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विधिवत आरती करण्यात आली. यानंतर राज्याचे कामगारमंत्री आकाश फुंडकर, नगराध्यक्ष अपर्णा सागर फुंडकर, बाजार समिती सभापती श्रीकृष्ण टिकार, माजी सभापती राजाराम काळणे, नगरसेवक महेंद्र रोहणकार यांनी माल्यार्पण करून पूजन केले.

विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि अभंग-कीर्तनाच्या निनादात शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाली. ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून वारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. शोभायात्रेत वारकरी संप्रदायातील भाविक, विविध सामाजिक संस्था, महिला मंडळे तसेच नागरिक सहभागी झाले. आकर्षक रथ, पारंपरिक वेशभूषा, भगवे ध्वज आणि संत तुकाराम महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित दृश्ये भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती.

महिला मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग
या भक्तिमय उत्सवात महिला मंडळांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळाला. संत तुकाराम महाराज व विठ्ठल नामाच्या जयघोषात महिला मंडळांनी पावली खेळत तसेच रिंगण सोहळा सादर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले. टाळ-मृदंगाच्या गजरात महिला वारकऱ्यांचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला. नगराध्यक्ष अपर्णा फुंडकर यांनीही या सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला.

लहानग्यांच्या वेशभूषेने वेधले लक्ष
शोभायात्रेत लहान मुलांनी संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज तसेच मावळ्यांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. चिमुकल्यांच्या या सहभागामुळे शोभायात्रेला विशेष रंगत आली आणि नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे कौतूक केले.

शोभायात्रेनंतर नगर परिषद शाळा क्रमांक ६ येथे महाप्रसाद वितरण करण्यात आले. स्वच्छता आणि शिस्तीचे काटेकोर पालन करत हजारो भाविकांनी महाप्रसाद घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वयंसेवक, पोलीस प्रशासन तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी संत तुकाराम महाराजांचे विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावेत, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

0 9 2 6 4 1
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *