पाण्यासाठी रायपूरच्या महिलांचा आक्रोश जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा

Khozmaster
3 Min Read

दहा कोटी खर्चूनही पाणीटंचाई
बुलढाणा, दि. ४ (प्रतिनिधी)
राज्यात शासनाकडून ‘हर घर जल – हर घर नल’ तसेच प्रत्येक कुटुंबाला शुद्ध आणि स्वच्छ पाणी देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असल्या तरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या योजना केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथे दिसून येत आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे रायपूर येथील ग्रामस्थांना मुबलक पाण्याचा स्रोत असूनही वर्षभर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे रायपूरपासून जवळच पळसखेड भटचा तलाव असून तेथे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनाच्या अनास्थेमुळे गावकऱ्यांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कित्येक वर्षांपासून रायपूर येथे बारोमास पाणीटंचाई कायम असून, पळसखेड भट तलावावरून पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली असतानाही प्रत्यक्षात ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे.
दरम्यान, महाजल योजनेवर ३ कोटी ८७ लाख, जलजीवन मिशन योजनेवर ४ कोटी २५ लाख, तसेच ग्रामपंचायतीमार्फत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून २ कोटी रुपये पाणीपुरवठ्यासाठी खर्च करण्यात आले. मात्र, इतका मोठा निधी खर्च होऊनही एकही योजना सुरळीत सुरू नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दोन-दोन महिने पाणी मिळत नसल्याने महिलांमध्ये प्रचंड नाराजी असून, खर्च केलेल्या निधीचा योग्य वापर झाला आहे का, याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांकडून जलवाहिनी फोडून सिंचनासाठी पाण्याचा वापर
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार पळसखेड भट येथून रायपूरपर्यंत टाकण्यात आलेली जलवाहिनी काही ठिकाणी फोडून त्यावर मोठे नळ बसवून शेतकरी सिंचनासाठी पाण्याचा वापर करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चोरी होत असून पाणीटंचाई अधिक तीव्र झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ही पाइपलाइन पिण्याच्या पाण्यासाठी आहे की सिंचनासाठी, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा
पाणीटंचाईच्या प्रश्नावर संतप्त महिलांसह ग्रामस्थांनी जिल्हा परिषद व पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. अमोल पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मोर्चात नलूबाई पाटील, दीपाली सोनुने, विद्या सिरसाट, इंदुबाई सोनुने, मंगला सिरसाट, पार्वती सिरसाट, नंदा सिरसाट, कावेरी पाटील, शाहेरीनबी शेख राजू, शारदा करडेल, गीता सास्ते, अमीनाबी शेख मसूद, यमुनाबाई पाटील, डी.ए. पाटील, अनिता भोसले, माया राजपूत, सखुबाई म्हस्के यांच्यासह असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.
गावातील पाणीपुरवठा योजनांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व रायपूरला तातडीने नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

0 9 4 9 6 2
Users Today : 134
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *