मेहकरातील अतिक्रमण होणार भुईसपाट लवकरच पालिका करणार कारवाई

Khozmaster
2 Min Read

डोणगाव, दि. ४ (प्रतिनिधी)

मेहकर शहरातील अतिक्रमण हा गेल्या काही काळापासून चर्चेचा विषय ठरला आहे. मेहकर नगरपालिकेने एप्रिल २०२५ मध्ये अतिक्रमणावर बुलडोझर चालवत मोठी कारवाई केली होती. त्या वेळी मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली होती. विशेष म्हणजे या कारवाईदरम्यान गोरगरीब अतिक्रमणधारकांच्या बाजूने विद्यमान नगराध्यक्ष किशोर गारोळे हे उभे राहिले होते.

मात्र, आता या महिन्यात शहरातील उर्वरित राहिलेले तसेच पुन्हा झालेले अतिक्रमण हटविण्याची तयारी नगरपालिकेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी कारवाईत नगराध्यक्षांची भूमिका काय राहणार, याबाबत शहरात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.

एप्रिल २०२५ मध्ये डोणगाव रोड, जानेफळ रोड, इंद्रप्रस्थ चौक तसेच मेहकर बसस्थानक रोड परिसरात अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली होती. या कारवाईदरम्यान पक्षपात झाल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला होता. काही ठिकाणी आंदोलने झाली होती. तसेच नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी या कारवाईविरोधात नगरपालिकेसमोर उपोषणसुद्धा केले होते. निवडणूक प्रचारातही अतिक्रमणाचा मुद्दा गारोळे यांनी प्रमुखत्वाने घेतला होता.

दरम्यान, आता पुन्हा नव्याने अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई सुरू होणार असल्याने यावेळी कोणाचे आणि कोणत्या प्रकारचे अतिक्रमण हटविले जाईल, याबाबत शहरात चर्चा रंगली आहे. पूर्वीप्रमाणेच पक्षपात करून कारवाई होणार की नियमाप्रमाणे सर्व अतिक्रमणधारकांवर कारवाई होणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कारवाई लवकरच सुरू होणार

अतिक्रमण कारवाईबाबत अभियंता विशाल शिरपूरकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, अतिक्रमण काढण्याची मोहीम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. प्रामुख्याने डोणगाव रोड, जानेफळ रोड, लोणार रोड तसेच मेहकर बसस्टँड परिसरातील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे.

यासोबतच ज्या ठिकाणी पूर्वी अतिक्रमण हटविण्यात आले होते, मात्र पुन्हा अतिक्रमण करण्यात आले आहे, त्या ठिकाणीही कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे बालाजी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण प्रथमप्राधान्याने हटविले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

नगरपालिकेच्या आगामी कारवाईकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, यावेळी कारवाई निष्पक्षपणे होणार का, याकडे नागरिकांचे विशेष लक्ष आहे.

0 9 4 9 6 2
Users Today : 134
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *