लोणार, दि. ४ (प्रतिनिधी)
देऊळगाव कुंडपाळ ग्रामपंचायतीअंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करीत संबंधित ठेकेदाराची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य नंदाबाई राठोड यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे राठोड यांनी सांगितले. याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनही सादर केले आहे.
राठोड यांनी आरोप केला की, ठेकेदाराने केलेली विकासकामे निकृष्ट दर्जाची असून, निधीचा दुरुपयोग करण्यात आला आहे. तसेच अंदाजपत्रकापेक्षा अधिक खर्च करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामपंचायतीअंतर्गत अंतर्गत सिमेंट रस्ते, सार्वजनिक शौचालय तसेच इतर विकासकामे कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात कामाचा दर्जा अत्यंत खराब असून कामे अपूर्ण असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणाची जिल्हास्तरावर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, तक्रारी केल्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याचेही नंदाबाई राठोड यांनी सांगितले. या उपोषणाला गावकऱ्यांनी पाठिंबा दर्शविला असून प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ठेकेदाराच्या चौकशीच्या मागणीसाठी महिलेचे उपोषण
0
9
4
9
6
2
Users Today : 134
Leave a comment