रस्त्यासाठी प्राणांशी खेळ ? विवरा-देवधाबा प्रकरणात जलसमाधीचा इशारा प्रशासन व सोलर कंपनीच्या भूमिकेवर संताप; आंदोलनाला टोकाचे वळण

KHOZ MASTER
2 Min Read

मलकापूर, दि. ४ (प्रतिनिधी)
विवरा-देवधाबा गावजोड रस्त्याच्या प्रश्नावर मागील एक वर्षापासून सुरू असलेल्या आंदोलनाला आता टोकाचे वळण मिळाले आहे. न्याय न मिळाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा विवरा येथील शेतकरी विनोद सरोदे, ज्ञानेश्वर संबारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.
विवरा ते देवधाबा हा रस्ता परिसरातील शेतकरी व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून याच मार्गावरून शेतीमालाची वाहतूक, दैनंदिन दळणवळण तसेच आपत्कालीन सेवांचा वापर केला जातो. मात्र, रस्ता अडविण्यात आल्याने वाद निर्माण झाला असून या समस्येवर तोडगा न निघाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, गेल्या एक वर्षापासून शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असतानाही प्रशासन व संबंधित सोलर पॉवर कंपनीच्या भूमिकेमुळे अद्याप ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे न्याय मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, आंदोलनाचा भाग म्हणून सहकारी सीताराम ढोण यांनी मागील अकरा दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या प्रकृतीत दिवसेंदिवस खालाव होत असल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत.
या पार्श्वभूमीवर विनोद सरोदे यांनी संतप्त भावना व्यक्त करत सांगितले की, “ही अवस्था पाहवत नाही. प्रशासनाला जर या प्रश्नात एखाद्याचा बळीच हवा असेल, तर रस्त्यासाठी माझा बळी देण्यास मी तयार आहे.” असे म्हणत त्यांनी जलसमाधी घेण्याचा निर्णय जाहीर केला.
ग्रामस्थांनी आरोप केला की, सोलर पॉवर कंपनीच्या कामामुळे शेतकऱ्यांचे पारंपरिक हक्क डावलले जात असून या प्रकरणात प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून विवरा-देवधाबा रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

0 9 7 2 6 6
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *