बुलढाणा, दि. ४ (प्रतिनिधी)
प्रशासनाकडून रेती घाटांची हर्रासी करण्यात आली असून बहुतांश रेती घाट सुरू करण्यात आले आहेत. सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड येथील रेती घाटाचाही लिलाव झाला आहे. मात्र या घाटातून नियमबाह्य व बेसुमार रेती उपसा होत असल्याने खडकपूर्णा नदीपात्रातील जलपातळी मोठ्या प्रमाणात घसरत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. परिसरातील जलस्त्रोत आधीच आटू लागले असून मार्च ते जून या कालावधीत भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने दुसरबीडचा रेती घाट बंद करण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
दुसरबीड येथील रेती घाटासंदर्भात अविनाश चव्हाण व शेख इरफान शेख समद यांनी २ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. दुसरबीड गावातून खडकपूर्णा नदी वाहते. नदीकाठावर शासनाकडून रेती घाटाचा लिलाव करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात तेथून रेतीचा उपसा सुरू आहे. परिणामी नदीकाठ उघडे पडले असून नदीपात्रात पाणी अत्यल्प प्रमाणात शिल्लक राहिले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे घाटाच्या मर्यादेपलीकडेही बेसुमार रेती उपसा केला जात असून त्याचा थेट परिणाम जलपातळीवर झाला आहे. या जलसंकटामुळे दुसरबीड येथील अनेक घरांच्या बोअरवेलचे पाणी कमी झाले असून परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीतही मोठी घट झाली आहे. काही विहिरी पूर्णपणे आटल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
रेती उपसा असाच सुरू राहिल्यास मार्चअखेरीस परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे तातडीने दुसरबीडचा रेती घाट बंद करून नदीपात्रातील जलसाठा वाचवावा, अशी मागणी अविनाश चव्हाण व शेख इरफान शेख समद यांनी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने कारवाई न केल्यास तढेगाव फाट्यावर शेतकऱ्यांसह उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
Users Today : 134